सातारा - खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. यानंतर औंधसह परिसरातील गावे हादरून गेली आहेत. बुधवार 6 मे रोजी ठाणे येथून एक कुटुंब दुचाकीवरून खरशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजिकच असणाऱ्या त्यांच्या घरात गृह विलगीकरणात ठेवले होते.
सोमवारी या कुटुंबातील एकाला त्रास जाणवू लागला.त्यामुळे त्याच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, त्रास होणाऱ्या व्यक्तीचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर त्याच्या संपर्कातील २१ वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
या घटनेमुळे औंध, खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. दरम्यान युवक पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून खरशिंगे गाव सील करण्यात आले आहे.