सातारा - पालिकेचे उपमुख्य अधिकारी संचित कृष्णा धुमाळ (वय 32, सध्या रा.केसरकर पेठ, मूळ रा. जोगवडी ता. भोर, पुणे) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर नगरसेवक बाळू खंदारे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी, धक्का देणे या गुन्ह्यांचा तक्रारीत समावेश आहे. 13 डिसेंबरला खंदारे यांनी धुमाळ यांच्या कार्यालयात आंदोलन केले होते.
काय आहे प्रकरण -
१३ डिसेंबरला सकाळी 10 वाजता तक्रारदार संचित धुमाळ हे त्यांच्या केबिनमध्ये काम करत बसले होते. त्यावेळी नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे (रा.मल्हार पेठ) हे धुमाळ यांच्या केबिनमध्ये शौचालयाच्या पाण्याची बादली घेवून गेले. केबिनमध्ये आल्यानंतर खंदारे यांनी ती शौचालयाच्या पाण्याची बादली धुमाळ यांच्या टेबलवर ठेवली. या सर्व घटनेने उपस्थित अवाक झाले व तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
हेही वाचा - मलकापुरात स्लॅब कोसळून 1 जण ठार, 5 जखमी
शौचालयाच्या पाण्याची बादली टेबलवर ठेवल्यानंतर 'मला शौचास आले आहे, मी येथेच शौचास करणार आहे, असे सांगत त्यांनी गैरकृत्य केले. तसेच त्यांनी कार्यालयात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी संचित धुमाळ यांच्या हाताला संशयित बाळू खंदारे यांनी जोराचा हिसका दिला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
हेही वाचा - जप्त करण्यात आलेला 19 लाखांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशाने नष्ट
त्यानंतर बुधवारी दुपारी तक्रारदार संचित धुमाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बुधवारी दुपारपासून या नाट्यमय घडामोडी घडत असताना पोलीस ठाण्याबाहेर राजमाता कल्पनाराजे भोसले या तळ ठोकून होत्या. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.