सातारा : विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी पुण्यातील दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले दोघेही तक्रारदार महिलेचे पती आणि सासू असून, हरीष खिलारे, चंद्रभागा खिलारे अशी त्यांची नावे आहेत.
पती घेत होता चारित्र्यावर संशय
पीडित विवाहित सध्या साताऱयात वास्तव्यास आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने पती हरीष दशरथ खिलारे याने चारित्र्याचा संशय घेत 'तुला घरातील कामे व्यवस्थित करता येत नाहीत,' असे म्हणून वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ केला. तक्रारदार महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. सासू चंद्रभागा दशरथ खिलारे हिनेही विवाहितेला शिवीगाळ, दमदाटी करुन शारीरिक व मानसिक छळ केला. 'तुला घरातील काम व्यवस्थित करता येत नाही. तुला काम करण्यास उशीर लागतो. तु घराच्या मागच्या दारात सारखी उभी राहतेस,' असे आरोपही केले.
हा संपूर्ण प्रकार २००८ ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने पती हरीष आणि सासू चंद्रभागा या दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक झालेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार दगडे करत आहेत.