सातारा - यात्रा रद्द केल्यानंतरही मटणाच्या मेजवानीचा आखलेला बेत पाटण तालुक्यातील मेंढ येथील काही ग्रामस्थांना चांगलेच महागात पडला. मंदिराच्या परिसरात दगडांच्या चुलींवर मटण शिजत असतानाच पोलीस आले आणि शिजणारे मटण तिथेच सोडून सगळे सैरावैरा पळाले. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी २१ जणांवर गुन्हा दाखल केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील मेंढ येथील ग्रामदैवताची यात्रा ग्रामस्थांनी रद्द केली होती. मात्र, काही जणांनी मंदिराच्या परिसरात बोकडाच्या मेजवानीचे नियोजन केले. स्थानिक ग्रामस्थ आणि पुनर्वसित झालेले काही धरणग्रस्त तेथे उपस्थित होते. दगडांच्या चुलींवर मटण शिजत ठेवले असतानाच अचानक तेथे पोलीस आले. पोलिसांना पाहताच ग्रामस्थ सैरावैरा पळाले. त्यातील काही जण पोलिसांच्या तावडीत सापडले. सरपंच अमित पाटील, पोलीस पाटील भगवान मत्रे यांच्या समक्ष पोलिसांनी पातेली, भांडी, तीन मोटरसायकली जप्त केल्या. याप्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मटणाच्या मेजवानीची आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईची ढेबेवाडी परिसरात खमंग चर्चा आहे.