सातारा - वन विभागाच्या अटींचा भंग करुन नाग जातीच्या विषारी सर्पांना 13 ते 14 दिवस बंदिस्त ठेवल्याप्रकरणी खटाव येथील सर्पमित्र बाबासाहेब अब्दुलरशिद काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खटाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खटाव येथील सर्पमित्र बाबासाहेब काझी यांना लोकवस्तीमध्ये आढळून येणाऱ्या विषारी सर्पांना पकडून, वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन 24 तासाच्या आत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याच्या अटीवर ओळखपत्र देण्यात आले होते. मात्र, बाबासाहेब काझी यांनी वनविभागाच्या अटींचा भंग करुन नाग जातीच्या 3 विषारी सर्पांना 13 ते 14 दिवस बंदिस्त ठेवल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.
खटाव येथून काझी यांनी बंदिस्त करुन ठेवलेले नाग जातीचे तीन सर्प ताब्यात घेऊन वनधिकाऱ्यांनी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. काझी यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 9 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उप वन संरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक एस. बी. चव्हाण, वन क्षेत्रपाल एस. एन. फुंदे, डी. एन. व्हनमाने, वनरक्षक एस. आर. दहीफळे, आर. एस. काशिद, पी. एन. माने यांच्या पथकाने केली.