औरंगाबाद - घरगुती किरकोळ कारणावरुन महिला डॉक्टरने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. प्रियंका प्रमोद क्षीरसागर (२७, रा. कांचनवाडी) असे तिचे नाव आहे. तसेच आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, असेही सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.
डॉ. प्रियंका क्षीरसागर यांचे डॉ. पती प्रमोद क्षीरसागर हे घाटीतील औषधीनिर्माण शास्त्र विभागात कार्यरत आहेत. या दोघांचा गेल्या पाच वर्षांपुर्वी विवाह झाला होता. मंगळवारी सकाळी डॉक्टर दाम्पत्यामध्ये घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याच कारणातून डॉ. प्रियंका यांनी दुपारी बाराच्या सुमारास बेडरूममधील फॅनला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार समोर आल्यावर डॉ. प्रमोद यांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली.
पोलीस दाखल होईपर्यंत प्रियंका यांना बेशुद्ध अवस्थेत फासावरुन खाली उतरविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका यांना तत्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रियंका यांच्या पश्चात पती आणि अडीच वर्षांचा मुलगा असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली. पोलिसांनी प्रियंका यांनी लिहिलेली सुसाईड नोट हस्तगत केली आहे. त्यामध्ये प्रियंका यांनी आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये, असे म्हटले आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.