सातारा - राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उदयनराजेंनी यासंदर्भात शिंदे-फडणवीसांशी पत्रव्यवहार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना रयतेचा सहभाग महत्वाचा मानला होता. त्यामध्येच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया रचला. (Udayanraje Letter To CM) प्रत्येक जाती-धर्माचा आदर केला. त्याच छत्रपतींचा आणि राष्ट्र उभारणीत सर्वस्व पणाला लावलेल्या राष्ट्रपुरुषांचा सातत्याने अवमान होत आहे. राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेऊन राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा करावा, असे उदयनराजेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
पत्रासोबत जोडला कच्चा मसूदा - संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असणाऱ्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणावा, अशी आमची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सातत्याने अवमानकारक वक्तव्ये झाली आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आपल्याला केवळ प्रतिक्रियावादी व्हावे लागत आहे. त्यामुळे कायदा करणे ही काळाची गरज आहे. त्याबाबत कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करुन तयार केलेला कच्चा मसूदाही पत्रासोबत जोडला आहे.
उदयनराजेंनी केल्या 'या' मागण्या - शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावा. अधिकृत इतिहास जगासमोर येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडावा. तो इतिहास खंड रुपात प्रकाशित करावा. नवी दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित परदेशातील विविध संग्रहालयात असणारी महत्वाची कागदपत्रे, वस्तू, चित्रे भारतात आणण्यासाठी वेगाने पावले टाकावी. छत्रपतींच्या जीवनावर, तसेच ऐतिहासिक प्रसंगावर आधारित कलाकृर्तीच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला मदत करणारी तज्ज्ञांची समिती नेमावी. प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना करावी, अशा मागण्या उदयनराजेंनी पत्रात केल्या आहेत.
भाजपाच्या प्रवक्त्यांपर्यंत वादग्रस्त विधाने - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील आणि देशातील काही भाजपाच्या नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाच्या प्रवक्त्यांपर्यंत काही नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर - पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले की, 'थोर पुरुषांनी आपले आयुष्य लोकांसाठी वेचले. लोकांचे कल्याण व्हावे हाच त्यांचा ध्यास होता. असे असूनही वारंवार त्यांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून केली जात आहे. चित्रपट असेल किंवा जाहीरपणे केली जाणारी वक्तव्ये असतील. का कुणास ठाऊक, पण ही विकृती दिवसेंदिवस वाढतेय. जग वेगाने पुढे जात आहे. लोकांनी फारसा विचार करणे बंद केले आहे, असे माझे ठाम मत आहे. प्रत्येकाचे जीवन व्यग्र झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर पडताना पाहायला मिळत आहे. हे एका दिवसात झालेले नाहीत.
देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही - शिवाजी महाराजांना वाटलं असतं की राजेशाही अस्तित्वात ठेवावी, तर या देशात अजूनही राजेशाहीच असती. त्याकाळी जगात एकमेव शिवाजी महाराज होते की त्यांना वाटलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असायला हवा. त्यामुळे इथे लोकशाही अस्तित्वात आली. पण नंतर देशाची फाळणी झाली. आज जर आपण स्वत:ला सावरलं नाही, तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातही विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे तुकडेही होतील. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आपल्याला आजची ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. या परिस्थितीचा विचार मनात आला की दु:ख वाटतं”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी खंत व्यक्त केली.
हे नक्की का घडतय? - यावरून चाललेल्या राजकारणाला मी फारसं महत्त्व देत नाही. यात राजकारण येऊच शकत नाही. इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही आहेच. आज राजेशाही असती, तर ही वेळ आली नसती. पण शिवाजी महाराजांना वाटलं होतं की लोकांच्या म्हणण्याला महत्त्व असलं पाहिजे”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. “हे सगळं का घडतंय ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपलं कुटुंब म्हणून स्वीकारलं. आज ती भावना कुठे आहे? शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊनच आपण इथपर्यंत आलोय. त्यांच्याविषयीची आस्था कृतीतून दिसून आली पाहिजे”, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.