सातारा - कोयना (ता. पाटण) परिसरात रविवारी २८ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.
या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसल्याची माहिती धरण विभागाकडून देण्यात आली. भूकंपाचा धक्का पाटण, कोयना, पोफळी आणि चिपळून याठिकाणी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून १६.८ किलोमीटरवर अंतरावर आणि गोषटवाडी गावाच्या नैऋत्य दिशेला ९ किलोमीटर अंतरावर होता. तर भूगर्भातील भूकंपाचे अंतर ११ किलोमीटर होते.
भूकंपाच्या धक्क्याने घरातील भांडी वाजू लागल्याने अनेकजण घराबाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास धक्का बसल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.