सातारा - अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील सांडवली येथे डोंगर कडा अथवा दरड कोसळण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माळीण अथवा आंबेघरसारखी दुर्घटना घडू शकते. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सांडवली गावठाणाचे पुनर्वसन लगतच्या पठारावर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
आमदार भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील पांगारे धरण येथील खचलेला रस्ता, पळसावडे धरण, बोंडारवाडी येथे झालेले नुकसान आणि सांडवली येथील नुकसान व डोंगरामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची पाहणी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली. सांडवली ग्रामस्थांची गंभीर समस्या सोडवण्यासाठी गावठाणाचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात डोंगर कडा, दरड कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने तातडीने हालचाल करावी. पुनर्वसनासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.
पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही
गावठाण पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच, खड्गावपासून रस्ता रिंगरोडला जोडून हा भाग थेट परळीला जोडण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पांगारे येथील खचलेल्या रस्त्याबाबत तोडगा काढण्यावरही सकारात्मक चर्चा झाली. स्वातंत्र्यानंतर दुर्गम सांडवली गावापर्यंत जिल्हाधिकारी पदाचा अधिकारी कधीही आला नाही. भाऊसाहेब महाराजांच्या काळात या भागात एकमेव अरुण भाटिया हे अधिकारी येऊन गेले होते, अशी आठवण शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी करून दिली. तसेच, सांडवलीमध्ये येणारे तुम्ही पहिलेच जिल्हाधिकारी आहात. स्वतः ग्रामस्थांच्या समस्येत लक्ष घातले, पाहणी केली आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.
हेही वाचा - बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सरकारशी बोलणार - शिवेंद्रसिंहराजे यांचं आश्वासन
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे आदी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - पाटणमध्ये आढळला 25 किलो वजनाचा 9 फुटी अजगर