सातारा - कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी स्वत:सह 5 नगरसेवकांसाठी सभागृहात स्वतंत्र बैठक व्यवस्थेची मागणी केल्याने सत्ताधारी जनशक्ती आघाडीत फूट पडली आहे. गुरूवारी झालेल्या विशेष सभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच भाजपमधून नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ. रोहिणी शिंदे यांना भाजपच्याच नगरसेवकांनी कोंडीत पकडल्याने भाजपच्या गटातील अंतर्गत सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली. यामुळे भविष्यात कराड नगरपालिकेच्या वर्तुळात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत सुरू असलेल्या आणि नव्याने करावयाची कामे, जैविक विविधता व्यवस्थापन समिती गठीत करण्याचा अहवाल, वॉटर प्रोटोकॉलची अंमलबजावणी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजना संदर्भातील धोरणात्मक निर्णय, रस्त्यांच्या डांबरीकरण कामाच्या दर्जाबाबतचा धोरणात्मक निर्णय आणि कराड शहराचा वाहतूक आराखाडा आणि त्याच्या अंमलबजावणीवर विचारविनिमय करण्याचे महत्वपूर्ण विषय कराड नगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या विशेष सभेच्या अजेंड्यावर होते. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेच्या प्रारंभीच उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी यापुढे सभागृहात आमच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या या मागणीमुळे सत्ताधारी जनशक्ती आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. उपनगराध्यक्षांसह त्यांना मानणार्या 5 नगरसेवकांनी सवता सुभा मांडत राजकीय भूंकपाचे संकेत दिले.
नगरपालिकेची विशेष सभा 3 तास सुरू होती. या सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांवर विस्तृत चर्चा झाली. परंतु, भाजपच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांना भाजपच्याच नगरसेवकांनी वारंवार कोंडीत पकडले. उपरोधिक टोमणे मारले. त्यामुळे भाजपच्या गटांतर्गत सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर आणि नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नगराध्यक्षा भाजपच्या आणि बहुमत जनशक्ती आघाडीचे, अशी विचित्र परिस्थिती कराड नगरपालिकेत आहे. बहुमत मिळालेल्या जनशक्ती आघाडीत तीन गट आहेत. त्यापैकी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह सवता सुभा मांडत राजकीय भूंकप घडविला. माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका शारदा जाधव, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र यादव यांचेही गट जनशक्ती आघाडीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकशाही आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या असल्या, तरी भाजपचेच नगरसेवक त्यांची कोंडी करत आहेत. यामुळे कराड नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.