सातारा- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी साताऱ्यात आले आहेत. मात्र याच दरम्यान एका महिलेच्या मृतदेहावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केल्यानंतर संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने खळबळ माजली आहे. या विचित्र प्रकारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण? अन ही अक्षम्य चुक नक्की कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माण तालुक्यातील पांढरवाडी येथील एक महिला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिच्यावर मागील आठ-दहा दिवस झाले उपचार सुरू होते. मात्र त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे गुरुवार ६ ऑगस्टला त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान, संबंधित महिलेचा मृत्यू झाला. चोवीस तास रुग्णालयात मृतदेह ठेवल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच संबंधित महिलेचा मृतदेह रुग्णालयाने कोरोनाबाबतची कोणतीही काळजी न घेता नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
एका शववाहिकेतून सदर मृतदेह पांढरवाडी येथे आणण्यात आला. त्या मृतदेहावर शुक्रवार ७ ऑगस्टच्या सकाळी पारंपरिक पध्दतीने सर्व धार्मिक विधी करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी साधारण शंभरच्या आसपास नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर शनिवारी सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे जाहिर करण्यात आले.
अहवाल समजताच प्रशासनासह ग्रामस्थांची तारांबळ उडाली. अंत्यसंस्कारास उपस्थितीत असणाऱ्यांची तर बोबडीच वळाली. आरोग्य यंत्रणेने तत्काळ पुढील पावले उचलण्यास सुरुवात केली.
त्यामुळे आज रविवार सकाळी होणारा सावडणेचा विधी रद्द करण्यात आला. संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.