सातारा : कोरेगाव तालुक्यातील बर्गेवाडी गावानजीकचा धोम डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटनाघडली आहे. कालव्यानजीकची शेती आणि रस्ता जलमय झाला. जलसंपदा विभागाने तातडीने लक्षघालून पाणी बंद केल्यामुळे संभाव्य हानी टळली. कालव्याची वेळेवर देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने असे प्रसंग वारंवार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उन्हाळ्यात याच पाण्याचा सदुपयोग झाला असता असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
कालवा फुटल्याने शेती जलमय : सातारा जिल्ह्यात उन्हाळ्यामुळे सध्या रोटेशन सुरू आहे. त्यातच बर्गेवाडी गावानजीकचा धोम कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले आहे. कालव्यानजीकच्या शेतामध्ये पाणी शिरले होते. त्याशिवाय रस्त्यावर पाणी आले होते. या घटनेची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने पाणी बंद केले. त्यामुळे संभाव्य हानी टळली. मात्र अचानक घडलेल्या अशा घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी पाणी सोडले : धोम डाव्या कालव्याचे उन्हाळी रोटेशन सुरू असून दोनच दिवसांपूर्वी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. धोम कालवा विभागाकडून कालव्याची वेळेवर देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने असे प्रसंग वारंवार उ्द्धवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कालव्यांची देखभाल दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
चुकीच्या कारभाराचा शेतकऱ्यांना फटका : जलसंपदा विभागाच्या चुकीच्या कारभाराचा अनेकदा शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ येते. धोम डाव्या कालव्याच्या बाबतीत घडलेल्या घटनेने त्याचाच प्रत्यय आणून दिला. या घटनेमुळे कालव्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. जिल्ह्यात अनेक कालव्यांची देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे.
उन्हाच्या झळा वाढल्या : सातारा जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळा वाढल्याने पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाली आहे. कोयना धरणाच्या विमोचक गेटमधून बुधवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले. 1000 क्युसिक पाणी सोडण्यात आले आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. अजून उन्हाळा संपायला 3 तीन महिने असताना आत्तापासून सातारा जिल्ह्यात पाण्याची कमतरता भासू लागली आहे.