सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांचे खासगी देवस्थान शिखर शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी हर-हर महादेवाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शिखर शिंगणापूर मंदिर हे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे देवस्थान आहे. या ठिकाणी उदयनराजे भोसले व राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्यावतीने शिवभक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला. शंभू महादेव मुख्य मंदिरामध्ये दैनंदिनी भजन, पुजन, शिवकथा कार्यक्रम करण्यात आले. शिवरात्रीनिमित्त रात्रभर मुख्य मंदिर भाविक भक्तांसाठी देवदर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. रात्री ११ च्या सुमारास अभिषेक व शिवपिंडीवर रुद्राभिषेक केला जाणार आहे. याठिकाणी पूजेला नवीन आंब्याचा मोहोर बेल, दवणा, फुले पिंडीवर अर्पण करण्यात आली. हरहर महादेवाच्या जयघोषात काही मानाच्या कावडींनी शंभू महादेवाच्या पिंडीवर पाणी घालण्यात आले.
यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती पाहता महाशिवरात्रीला गर्दीचे प्रमाण कमी असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने आणि महसूल विभागाने या ठिकाणी वाहतुकीचे आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन चांगल्याप्रकारे केले.