सातारा - महाराष्ट्रात प्रथमच लाल आणि हिरव्या भाताची लागवड महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे. यापूर्वी निळा भात व केशर लागवड असे प्रयोग महाबळेश्वरमध्ये कृषी विभागाने यशस्वी केले आहे. लाल आणि हिरव्या भाताची लागवड करत महाबळेश्वरच्या कृषी विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
कृषी विभागाचा पुढाकार
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील बिरवाडी या गावात कृषी विभागामार्फत पौष्टिक अशा हिरव्या व लाल भाताची लागवड करण्यात आली आहे. बिरवाडी येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात 'एसआरटी' म्हणजेच सगुना भात तंत्रज्ञान पद्धतीने गादीवाफ्यावर लागवड करण्यात आली. भात म्हटले की फक्त पांढरा रंग आठवतो. परंतू गेल्याच आठवड्यात महाबळेश्वर तालुक्यात निळ्या भाताची लागवड करण्यात आली होती. याचबरोबर आता हिरव्या व लाल भाताची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड करताना शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन केले. यावेळी सातारा कृषी उपसंचालक विजय राऊत, वाई उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, सातारा तंत्र अधिकारी महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे, मंडळ कृषी अधिकारी बुधावले, कृषी सहायक दिपक बोरडे, विशाल सूर्यवंशी, शेतकरी समीर चव्हाण उपस्थित होते.
काय आहेत फायदे?
हिरव्या भातामध्ये 96% फायबर, फॅट फ्री भात तसेच अँटीऑक्सिडेंटस, न्यूट्रीयन्टस व व्हिटामिन्स विपुल प्रमाणात आढळतात. लाल भातामध्ये फायबर, आयर्न, मँगेनीजचे प्रमाण जास्त आहे. तसेच मुबलक प्रमाणातील आर्यन व व्हीटामिन्समुळे रक्तातील लाल पेशींची संख्या वाढण्यास मदत होते. या भातामध्ये ब्राऊन भातापेक्षा दहापट जास्त अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण आहे.
हरितद्रव्यांमुळे हिरवा रंग
ग्रीन राइसबद्दल माहिती देताना कृषी सहायक दिपक बोर्डे म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये प्रथमच हिरव्या भाताची लागवड होत आहे. 'तिलकस्तुरी' हे हिरव्या भाताचे वाण असून ते 140 दिवसांमध्ये तयार होते. या भात पिकाची वाढ 125 सेंटीमीटरपर्यंत होते. तसेच वनस्पतींच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यांमुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. हेच पानांमध्ये असणारे हरितद्रव्य भाताच्या दाण्यांमध्ये आढळते. त्यामुळे भाताचे दाणे हिरवे दिसतात. याला हिरवा भात किंवा ग्रीन राइस म्हटले जाते. 110 दिवसांचे लाल भाताचे वाण असून यामध्ये अॅन्योसायनीनचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
हेही वाचा -दूध ऑडिटसंदर्भात सरकारने 25 जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा... - अजित नवले