सातारा: तेजस मानकर यांचे पार्थिव रविवारी साताऱ्यात आणण्यात आले. जावळीच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा समुदाय उपस्थित होता. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अबालवृद्धांना गहिवरून आले. सरताळे, म्हसवे, कुडाळ, सोनगावसह जावली तालुक्यातील तमाम नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. बंदुकीतून हवेत फैरी करत त्यांला मानवंदना देण्यात आली.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले : शहीद जवान तेजस मानकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार, सौरभ शिंदे यांनी शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे.
कुटुंबाला सैनिकी सेवेचा वारसा: जवान तेजस यांच्या कुटुंबाला सैनिकी सेवेचा वारसा आहे. त्यांचे वडील मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत, तर भाऊ सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत आहे. चुलते शशिकांत मानकर हे देखील सैन्य दलात आहेत. सैन्य दलातून देशसेवा करण्याची परंपरा मानकर कुटुंबाने कायम राखली आहे. 2 वर्षापूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची पंजाबमधील भटिंडा येथे नियुक्ती झाली होती. देशाची सेवा करण्यासाठी एखादा तरुण सैन्यदलात दाखल होतो, परंतु अश्या प्रकारे घातपात होऊन जेव्हा शहीद होतो तेव्हा मनाला खूप वेदना होतात. मानकर कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या संपूर्ण घटनेची चौकशी होण्यासाठी केंद्रीय पातळीवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
जावळीच्या सुपुत्राचे सर्वोच्च बलिदान: वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान कायम प्रेरणा देत राहील. आम्ही सर्वजण मानकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी शहीद तेजस मानकर यांना श्रद्धांजली वाहिली. तेजस मानकर यांचे बलिदान आम्ही कायम स्मरणात ठेऊ. आम्ही सर्वजण जावळीकरांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा संवेदना आमदार शिवेंद्रराजेंनी व्यक्त केल्या.