सातारा - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण गोरख पिटेकर (वय २९) याला जिल्हा न्यायालयाने पोक्सोंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अत्याचार करुन धमकावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐक्यप्रेस झोपडपट्टीत राहणारा लक्ष्मण पिटेकर याने १९ मे २०१४ रोजी एका ११ वर्षाच्या मुलाला दौलतनगर व करंजे हद्दीत दुचाकीवरुन नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला होता. तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
न्यायालयाने धरले दोषी
पोलिसांनी तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी लक्ष्मण पिटेकर याला दोषी ठरवून बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तर ३७७ कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवसांची साधी कैद आणि कलम ३६३, ५०४, ५०६ अन्वये एक वर्ष सक्त मजुरी आणि ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ही शिक्षा एकत्रित भोगायची आहे.
डॉक्टरांची साक्ष महत्वाची
या खटल्यात फिर्यादी, पिडीत मुलाची आणि वैद्यकीय अहवालावरुन डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अजित साबळे-कदम आणि नितीन मुके यांनी काम पाहिले. पैरवी कर्मचारी हवालदार अविनाश पवार, रवींद्र जाधव, क्रांती निकम यांनी काम पाहिले.