सातारा - सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील अनेक डॉक्टर, गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करणाऱ्या एजंटवरती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर यांनी कारवाई केली आहे. यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामांकित डॉक्टरांची आज (रविवार) पहाटे पासून चौकशी चालू करण्यात आली आहे. तर, काही एजंटसुध्दा ताब्यात घेतले गेले आहेत. हे रॅकेट जिल्ह्यापुरते मर्यादित नसून कर्नाटक राज्यातील काही औषधे विक्रेते देखील यामध्ये सामील असल्याचे समोर आले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, की आज (रविवार) पहाटे वडूज येथील बाबर नामक एजंटला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून चौकशी चालू केली आहे. याप्रकरणी मंगळवेडा पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात ३ महिला गर्भलिंग चाचणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यामध्ये वडूज येथील गोडसे नामक दाम्पत्य यांना त्या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक, मंगळवेढा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर यांनी अटक केली होती.
हेही वाचा - कराड शहरावर राहणार 125 सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर, नगरपालिकेचा निर्णय
पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तर, त्याचा तपास करण्यात येत असताना हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्नाटकमधून औषधे पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - साताऱ्यात शिकारीच्या स्फोटकामुळे म्हशीचा जबडा फाटला