सातारा - राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांची पत्नी इंदिरा घार्गे यांना न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन शुक्रवारी रद्द केला. न्यायालयाने दिलेली हजेरीची अट न पाळल्यामुळे हा जामीन रद्द करण्यात आला.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्नी इंदिरा घार्गे यांच्या विरोधात अतुल शहा यांनी १७ जुलै २०१८ रोजी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. याप्रकरणात घार्गे यांनी न्यायालयात धाव घेवून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, मंगळवारी आणि शुक्रवारी हजेरीची अट घातली. ही अट त्यांनी न पाळल्यामुळे सरकारी पक्षाने आणि तक्रारदार शहा यांनी घार्गे यांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला. यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायालयाने घार्गे पती-पत्नीचा अटकपूर्व जामीन रद्द केला, अशी माहिती अॅड.विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली.
काय आहे प्रकरण -
घार्गे यांचा कोडोली येथील श्रीनगर कॉलनीत एक ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. ट्रॅक्टर व्यवसायाच्या निमित्ताने शहा आणि घार्गे यांची ओळख होती. त्यामुळे घार्गे यांनी २००५ साली पैशाची गरज असल्याने शहा यांना भेटून त्यांचा फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये ३ लाख ४० हजार रूपयांचा व्यवहार झाला. ठरलेल्या रकमेपैकी शहा यांनी २ लाख १० हजार रूपयांचा डीडी घार्गे यांच्या प्रिया एजन्सीच्या नावाने काढला. मात्र, घार्गेंना पैसे दिल्यानंतर त्यांनी फ्लॅटची कागदपत्रे तयार करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शहा यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता एमआयडीसीच्या कायद्याने तो फ्लॅट त्यांना विकता येऊ शकत नाही, असे समजले. त्यानंतर शहा यांनी घार्गे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला.