कराड (सातारा) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. जावळी तालुक्यातील 54 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. संबंधित कोरोनाबाधित रुग्ण आता पूर्ण बरा झाल्याने त्यांना टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप देण्यात आला. आतापर्यंत एकूण ३ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
जावळी तालुक्यातील ही व्यक्ती मुंबई येथे चालक म्हणून काम करत होती. तेथून गावी परतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरुवातीला खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
पुढे उपचारानंतर 14 आणि 15 दिवसांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता ते कोरोना मुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडले. यावेळी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून आणि टाळ्यांच्या गजर करून उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या