कराड (सातारा) - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टाळी, थाळी आणि दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकाद्वारे केली आहे. देशवासियांनी रविवारी (दि. ५) रात्री ९ वाजता घरात अंधार करून पणत्या, मेणबत्त्यांचे दिवे लावावेत, असे आवाहन मोदींनी केले आहे. त्यावर टीका करताना आमदार चव्हाणांनी हा नवा जुमला असल्याचे म्हटले आहे.
मागील १५ दिवसांच्या कालावधीत प्रधानमंत्री मोदी यांचे हे तिसरे भाषण आहे. प्रत्येकवेळी कोरोना विषाणूच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.
कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या मुद्द्यांवर ते का बोलले नाहीत, असा सवालही चव्हाण यांनी पत्रकात केला आहे.
देश गंभीर परिस्थितीतून जात असतानादेखील कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून ते एकतर्फी संवाद साधत आहेत. पत्रकार परिषद घेऊन देशवासियांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी, ही लोकांसमोर मांडलेली त्रिसूत्री अतिशय दुर्दैवी असल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकात म्हटले आहे.