सातारा - पोलिसांना मारहाण करणे, चोरी, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका तरूणाने जिल्हा रूग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातून पलायन केले. मुबारक बंडीलाला आदीवाशी (वय १९, रा.कटणी,मध्यप्रदेश) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
चार दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल -
मध्यप्रदेशातील रहिवासी असलेली एक लुटमार करणारी टोळी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केली होती. या टोळीचा हा तरूण सदस्य होता. फेब्रुवारी महिन्यात तो सातारा मध्यवर्ती कारागृहात होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलेली होती. तिथे कैद्यांची कोरोना चाचणी केली असता त्यात हा तरूण कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला चार दिवसांपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांची दोन पथके रवाना -
रूग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये त्याच्या सुरक्षेसाठी एका पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक संबंधित आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याची नजर चुकवून पलायन केले. हा प्रकार बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सातारा शहर, एलसीबीची टीम सिव्हिलमध्ये दाखल झाली. सिव्हिलमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर संबंधित आरोपी कुठल्या प्रवेशद्वारातून पळून गेला, हे समोर आले. त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत.
काय होते आरोप -
कमी दरात सोने विकण्याच्या बहाण्याने लूटमार करणारी मध्य प्रदेशातील कटणी येथील आठ जणांची टोळी कराड- उंब्रज परिसरात कार्यरत होती. या टोळीने पाटणच्या पोलिसांवर हल्ला केला होता. कराड तालुक्यातील पेर्ले गावाच्या हद्दीत सोन्याचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती.