सातारा - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 15 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. पाटील यांंच्यावर कराडमधील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना वॉर्डात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती स्थिर असताना मधूमेह तसेच रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना मुंबई येथील नामांकित अशा ब्रिच कॅन्डी या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशीच ट्रीटमेन्ट सामान्य रुग्णांना का दिली जात नाही? असा सवाल जिल्हावासीयांमधून उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 883 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत. तर सध्या 3 हजार 411 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटर्समध्ये उपचार सुरु आहेत. अशात जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटीलही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
पालकमंत्री पाटील यांच्यावर कराडमधील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना वॉर्डात उपचार सुरु होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाटील यांची भेट घेऊन पालकमंत्री पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
आज सकाळी बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना मधूमेह तसेच रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना मुंबई येथील नामांकित अशा ब्रिच कॅन्डी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी सुविधा सर्व सामान्य रुग्णांना का मिळत नाही..? असा सवाल सामान्य जनतेमधून विचारला जात आहे.