कराड (सातारा) - मागील विधानसभा निवडणुकीत राबवण्यात आलेल्या 'सुपर ६०' उपक्रमानंतर आता काँग्रेसने 'सुपर १०००' उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे तरुण-तरुणींना राजकीय, सामाजिकदृष्ट्या प्रशिक्षित करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती या उपक्रमाचे राज्य समन्वयक आणि प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली 'सुपर १०००' हा उपक्रम काँग्रेसने हाती घेतला आहे. या उपक्रमाची माहिती शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - मतदान यादी दुरुस्तीवरून तहसील कार्यालयात गोंधळ, मतदारांनी केले स्टिंग ऑपरेशन
प्रदेश युवक काँग्रेसचा 'सुपर १०००' उपक्रम
'दिवंगत राजीव गांधींनी युवकांच्या स्वप्नातील भारताची पायाभरणी केली. युवकांना राजकारणात आणले. त्याच मार्गाने युवक काँग्रेसची वाटचाल सुरू आहे', असे शिवराज मोरे म्हणाले. 'तरुण-तरुणींना राजकारणात संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने 'सुपर १०००' हा उपक्रम हाती घेतला आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्रातील एक हजार तरुण-तरुणींना प्रशिक्षण देणार आहोत. तसेच, या उपक्रमात यशस्वी होणार्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचा युवक काँग्रेसचा मानस आहे', असे मोरे यांनी सांगितले.
गुगल फॉर्मद्वारे नोंदणी
'महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लिंकवरील गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. गुगल फॉर्मद्वारे सर्व नोंदणी केली जाईल. ही नोंदणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत करणे आवश्यक असून गुगल फॉर्मची लिंक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या फेसबुक व ट्विटर अकाउंटवर उपलब्ध असेल. गुगल फॉर्मवर आलेल्या अर्जांची छाननी करून एक हजार तरूण-तरूणींची निवड होईल. त्यानंतर त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशिक्षित केले जाईल,' असे शिवराज मोरे यांनी सांगितले.
या वेळी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी प्रदीप सिंघव, युवक काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, सातारा जिल्हा प्रभारी अजय इंगवले, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव उमेश ताटे उपस्थित होते.
हेही वाचा - गुरुद्वारातील दर्शनानंतर बच्चू कडू पलवलकडे रवाना; रॅलीला प्रतिसाद, जागोजागी स्थानिकांकडून स्वागत