कराड (सातारा) - कराड दक्षिणमधील भाजप उमेदवाराला जनतेचा पोकळ कळवळा आहे. त्यांचे प्रेम बेगडी आहे. त्याला भुलू नका, फसू नका. नोकर्या दिल्याचे सांगून एकाप्रकारे लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात असून विरोधकांच्या या बेगडी प्रेमाला जनतेने मतपेटीतून उत्तर द्यावे, असे आवाहन कराड दक्षिणचे महाआघाडीचे उमेदवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते आज कराड तालुक्यातील विंग येथे आयोजित कराड दक्षिण विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीतील महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते, रघुनाथराव कदम, सारंग पाटील, जयवंत जगताप, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, पैलवान नाना पाटील, इंद्रजीत चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की 'मी कराड-चिपळूण रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवली. कराड-ढेबेवाडी हा मार्ग मी कोकणाला नेऊन जोडणार आहे. विकासाच्या अनेक संकल्पना घेऊन मी तुमच्या सेवेत कार्यरत आहे. परंतु, नाकर्ते सरकार आपल्या भागाचा निधी नागपूरला पळवत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कोलमडला आहे. सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली आहे. विकास दर घसरला आहे.'
'कराड दक्षिणमध्ये मला विकासाची अनेक कामे करता आली. मी मंजूर केलेली अनेक कामे विरोधी मंडळींनी अडवली. तलाव, पुलाच्या कामांना विरोधी उमेदवाराच्या गटाने विरोध केला. त्यांच्या स्वत:च्या रेठरे गावात दिलेला निधीही त्यांनी नाकारला. विरोधकांनी माझ्यापेक्षा दहापट कामे करावीत. मी तुम्हाला कुठे अडवले आहे, असा प्रतिसवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.
सातारा जिह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. आयोजित प्रचार सभेत लोकसभा उमेदवार श्रीनिवास पाटील म्हणाले, की 'लोकांनी कराडच्या इतिहासाची आठवण ठेवावी. देशाच्या इतिहासात कराडचे यशवंतराव चव्हाण, दिवंगत प्रेमलाकाकी, दिवंगत आनंदराव चव्हाण आणि सध्या पृथ्वीराज चव्हाण या चौघांनीही विकासाची कामे केली. ही वस्तुस्थिती सर्वज्ञात असताना आम्ही काय केलं, असे विरोधक म्हणतात. जनतेने त्यांचा ढोंगीपणा ओळखावा. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत ढोंगी लोकांचा बुरखा फाडावा.'
उदयनराजेंच्या डॉयलॉगची खिल्ली उडविताना डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, एक बार जो कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नही सुनता, ही आम्हाला दिलेली कमिटमेंट तुम्ही पाळली का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. विकासाची दूरदृष्टी असणार्या श्रीनिवास पाटील यांनाच संसदेत पाठविण्याचा आम्ही निर्धार केल्याचे मोहिते म्हणाले.