सातारा : भरधाव वाहनांचा वेग, त्यामुळे होणारे अपघात आपण नेहमीच बघत असतो. सातारा जिल्ह्यात असाच एक भीषण अपघात घडला आहे. खानावळीत जेवण करून शतपावलीसाठी फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणांना खंडाळा तालुक्यातील वडवाडी-हरतळी मार्गावर बोलेरो जीपने जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश आनंदराव कदम (रा. पाटण), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मयूर भिसे (होमगाव, ता. जावळी) आणि श्रीजीत थोरात (पाटण) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते खंडाळा तालुक्यातील वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी आहे.
अपघातानंतर बोलेरो चालकाचे पलायन : बुधवारी रात्री खानावळीत जेवण करून आपल्या मित्रांसोबत वडवाडी-हरतळी मार्गावर फेरफटका मारायला गेले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव बोलेरो जीपने उडवले. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. या तरूणांना उडवून बोलेरो चालक नामदेव रघुनाथ काटकर याने जखमींना रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, अपघाताच्या आवाजाने गोळा झालेल्या नागरीकांनी त्याच बोलेरोतून (क्र. एम. एच. १२ एम. आर. ०८७६) तिन्ही जखमींना भोर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी एकाचा मृत्यू झाला.
राजस्थानमधील दांम्पत्याची आत्महत्या : खंडाळा तालुक्यातून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील एका दाम्पत्याने एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ओमप्रकाश छितरसिंह परिहार आणि पत्नी नेहा परिहार, अशी त्यांची नावे आहेत. धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील शिंगरे वस्तीवरील शेतात एका लिंबाच्या झाडाला दोरी बांधून पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामदास परिहार या नातेवाईकाकडे हे दाम्पत्य चार दिवसांपुर्वी आले होते. शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा :