सातारा : इको सेन्सिटिव्ह झोन, बफर झोन, कोअर झोनच्या जाचक अटी, निर्बंध आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव असह्य झाल्याने पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पोलीस आणि मोर्चाचे नेतृत्व करणार्या सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात झटापट झाली. सत्यजितसिंह पाटणकर बॅरिकेट्स तोडून आत घुसले. शेतकर्यांनीही पोलीस बळाला धुडकावून प्रांत कार्यालयात धडक दिली.
शेतकऱ्यांच्या मागण्या सोडावाव्यात : कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र, इको सेन्सिटिव्ह झोन, कोअर, बफरझोन स्थानिकांवर अन्याय सुरू आहे. शासन आणि राज्यकर्त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. न्याय व हक्कासाठी आत्तापर्यंत लोकशाही पद्धतीने लढा दिला आहे. शेतकर्यांना कोणताही पक्ष अथवा गट नसतो. त्यामुळे शेतकर्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा यापुढे आम्ही भीक मागायला येणार नाही. शासनाला सळो की पळो करून सोडू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला.
सत्यजितसिंह पाटणकर यांचा आरोप : सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, पाटण तालुक्यावर पर्यावरण प्रकल्पांची कुर्हाड मारण्यात आली आहे. त्यात स्थानिक जनता भरडली आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यात बर्यापैकी यश आले. मात्र, अजून काही प्रश्न आहेत. वन्य प्राणी कोणताही पक्ष, मिंधे अथवा खोके गट पाहून वन्य प्राणी पाळीव जनावरांवर हल्ला आणि शेतीचे नुकसान करत नाहीत तर ते सरसकट नुकसान करतात. वन्यजीव विभाग पंचनामे करताना स्थानिकांकडून पैशाची अपेक्षा ठेवतात, असा आरोप देखील पाटणकरांनी केला.
बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्या : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मानवी तसेच शेतीच्या नुकसानीसाठी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाईसह तीसहून अधिक मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यावर पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला.
वन्य प्राण्यांइतकाच प्रशासनाचा त्रास : पाटण तालुक्यातील कष्टकर्यांसाठी वन्य प्राण्यांसह पर्यावरण प्रकल्पांच्या माध्यमातून होणारा प्रशासकीय त्रासदेखील जीवघेणा ठरत आहेत. यापुढे अशा पद्धतीने स्थानिकांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्यास तो डाव हाणून पाडू. एका बाजूला तापोळा, कास, बामणोलीला वेगळा न्याय आणि कोयना धरणाच्या परिसराला वेगळा न्याय दिला जात आहे. या अन्यायाविरोधात सर्वपक्षीय लढा पुकारू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिला.