सातारा - महादरेच्या जंगलाला लवकरच संवर्धनासाठी राखीव जंगलाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे ग्रामस्थ आनंदात आहेत. पण, त्यांचे एक दुखणे आहे, ते म्हणजे शेतीवर अवलंबून असलेल्या तेथील शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या नुकसानीपासून संरक्षण हवे आहे. आमच्या वाड-वडिलांपासून ग्रामस्थ हे जंगल राखत आले, पुढेही राखणार. पण, वन्यजीवांबरोबरच हे जंगल राखणारेही जगले पाहिजेत, अशा भावना महादरे ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.
बिबट्यासह वन्यजीवांचा अधिवास
हद्दवाढीमध्ये नव्याने समावेश झालेले महादरे हे सुमारे ४०० लोकवस्तीचे गाव. राजवाड्यापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे. शेती हे या गावाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. दूध, छोटी-मोठी नोकरी करून या ग्रामस्थांची रोजीरोटी चालते. सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वर डोंगराच्या कुशीत महादरे गाव आहे. या गावाने पिढ्यानपिढ्या महादरेचे जंगल जपले. या डोंगरात कधी तूट होऊ दिली नाही कि, कधी वनवा लागू दिला नाही. निमसदाहरित स्वरुपाच्या या जंगलाला पाण्याच्या बारमाही नैसर्गिक स्त्रोतामुळे बिबटे, रानडुकरे, मोर-लांडोर आदी पशुपक्षांचा अधिवास आहे. महादरेच्या 108 हेक्टर वनक्षेत्राला 'फुलपाखरू संवर्धन राखीव'चा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
हल्ल्यात शेतकरी जायबंद
वन्यजीव कधीही येतात अन् उभे पिक फस्त करतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे ७० टक्के शेती पडून आहे. जमीन कसतात ते पिकाच्या संरक्षणासाठी रात्रीचे राखणीला बसतात. मात्र, अनेकदा रानडुकरांच्या हल्ल्यात स्वत:चा बचाव करताना बांधावरून पडून शेतकरी जायबंदी होत आहेत. गावातील सुनील निपाणे गुरेचराईसाठी गेले असताना रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. बरगड्या तसेच पायाला मार लागल्याने ते जायबंदी झाले.
आम्ही फक्त कष्टच करायचे का?
महादरेच्या जंगलास संवर्धन राखीवचा दर्जा मिळणार असल्याने त्याचे स्वागत करत गावातील तरुण संदीप निपाणे यांनी डोंगरात वन्यजीवांसाठी बारमाही पाणवठ्यांची निर्मिती करावी. तसेच त्यांच्या खाद्याची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. "दिवस-रात्र काबाडकष्ट करायचे अन् पिक हाता-तोंडाशी येते त्यावेळी बरोबर नासधूस होते. यात शेतकऱ्याला काय मिळते? आम्ही फक्त कष्टच करायचे का? असा उद्विग्न सवाल करत 'जसे आपण वन्यजीवांचे संरक्षण करतो, तसे वनविभागाने आमचे, आमच्या पिकाचे संरक्षण करावे' अशी अपेक्षा वर्षा निपाणे यांनी व्यक्त केली.
भरपाईची प्रक्रिया सुलभ असावी
पिकाच्या नुकसानीनंतर होणाऱ्या सोपस्कारांना शेतकरी कंटाळले आहेत. महादरेचे माजी सरपंच रवींद्र पाटेकर याबाबत म्हणाले, "जनावरांनी नुकसान केल्यास तत्काळ जाग्यावर भरपाई मिळावी. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, वनविभाग या सगळ्यांच्या वेळा घेऊन सर्वांना एकत्र करणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करावी.