कराड (सातारा) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव बफर क्षेत्रातील देशमुखवाडी गावच्या हद्दीत रानडुकराची शिकार करणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. वनविभागाने ही कारवाई केली आहे. अजित प्रकाश सुतार (रा. मुरुड, ता. पाटण), जयवंत रघुनाथ सुतार, सुरेश राजाराम सुतार, नारायण संभाजी सुतार, सुनील राजाराम सुतार, जगन्नाथ गणपती सुतार (सर्व रा. देशमुखवाडी, ता.पाटण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव बफर क्षेत्रातील देशमुखवाडी गावच्या हद्दीत रानडुकराची शिकार करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वन अधिकारी कर्मचारी आणि श्वान पथक घेऊन घटनास्थळी पोहोचले. आरोपींनी भाल्याच्या सहाय्याने रानडुकराची शिकार करून शिजवलेले मटण खड्ड्यात पुरून ठेवले होते. श्वान पथकाच्या मदतीने ते शोधून काढण्यात आले. मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली.
हेही वाचा - हृदयदावक..! आठ महिन्याच्या चिमुकलीची हत्या करत आईने केली आत्महत्या
कोयनानगरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनपाल दिग्विजय रासकर, वनरक्षक अतुल खोत, वनरक्षक प्रमोद पाटील, प्रशांत भोसले, संतोष चाळके, अमित वाजे, जावेद मुल्ला, सचिन पाटील, हेळवाक वनपरिक्षेत्रातील वनरक्षक गोरख बागुल, अक्षय चौगुले, प्रकाश शिंदे यांनी ही कारवाई केली. तर सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे तपास करीत आहेत.