सातारा- खोटे सात-बारा उतारे व ई-करार सादर करून जकातवाडी विकास सेवा सोसायटीची तब्बल २६ लाख ८२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष विठ्ठल माने, नितीन लक्ष्मण माने, हेमंत विठ्ठल माने, विठ्ठल बाबुराव माने व मालन विठ्ठल माने (सर्व रा. शहापूर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
खोटे सात-बारा उतारे आणि ई-करार सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी तानाजी रामचंद्र शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. २०१३-२०१४ यावर्षी खोटे सात-बारा व ई-करार सादर करत संतोष माने याने ६ लाख ५० हजार, नितीन माने याने ४ लाख ६४ हजार, हेमंत माने यांने ७ लाख १५ हजार, विठ्ठल माने याने ६ लाख पाच हजार व मालन माने यांनी २ लाख ४८ हजार हजार रुपयांचे कर्ज काढले होते. कर्ज काढत एकूण २६ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार भोईटे हे अधिक तपास करत आहेत.