सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयात आढळलेल्या मृत अर्भकप्रकरणी गर्भपात करवून घेणार्या महिलेसह अज्ञात गर्भलिंग निदान करणार्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात दोन महिन्यांपूर्वी एक स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले होते. संबंधित महिलेने तिला पहिल्या तीन मुली असताना प्रत्येक सोनोग्राफी करताना दोन मुली असल्याची खोटी माहिती दिली होती, असे तपासादरम्यान समोर आले. 27 जुलैला रक्तस्त्रावाचा त्रास होत असल्याने संबंधित महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.
या महिलेस वॉर्ड क्रमांक सातमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी ती शौचालयात गेली असता गर्भपात झाला. मात्र, तिने याबाबत कोणाला काही सांगितले नाही. काही दिवसांनी सफाई कामगाराला तुंबलेले स्वच्छतागृह साफ करताना मृत अर्भक सापडले. या घटनेमुळे मोठा गदारोळ झाला होता. या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली.
या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठवला. या अहवालात संबंधित महिला आणि सोनोग्राफी करणाऱ्या व्यक्ती दोषी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. करपे यांना संबंधितावर तक्रार देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात मृत अर्भक फेकून जाणार्या मातेसह अज्ञात सोनोग्राफी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.