सातारा - महाबळेश्वरहून मुंबईला जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पर्यटकाची कार ६०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एक महिला जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंब्रा ठाणे येथून आलेले पर्यटक दाम्पत्य कारने (एम एच ०२ ईएच १२०८) मुंबईकडे निघाले होते. पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात, बुवासाहेब मंदिरानजीक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून गाडी ६०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात नेहा मोहम्मद चौधरी (वय २२) या जागीच ठार झाल्या. महंमद इर्शाद चौधरी व सिराज हमीद शेख (चालक) सर्व राहणार मुंब्रा, मुंबई गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महाबळेश्वर ट्रेकर्स व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य राबविण्यात आले. गाडी खोल दरीत, आडबाजूला कोसळल्यामुळे गाडीजवळ पोहोचण्यात फार अडचणी आल्या. अपघातामुळे पसरणी घाटात वाहतूक ठप्प झाली होती. बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. जखमींना वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, महाबळेश्वर-पाचगणी येथे पर्यटन आणि हॉटेल व्यवसायास नुकतीच परवानगी मिळाली आहे. यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी वाढली आहे.
हेही वाचा - महाबळेश्वर-पाचगणीत घोडेस्वारी अन् नौका विहारासाठी सशर्त परवानगी
हेही वाचा - ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने यंत्रणेला जाग; १२ तासांत रस्त्याचे काम सुरू