सातारा - साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना हा अपघात झाला आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी कठड्याला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुण्याकडे जाताना अपघात - पुण्यातील सराफ कुटुंबीय गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना त्यांच्या इनोव्हा कारला (क्र. एम. एच. 14 डी. एफ. 6666) खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी कठड्याला धडकली. या अपघातात रंजना ज्ञानेश्वर सराफ (वय 52) आणि कांतीकाबाई वाल्मीक जाधव (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ (वय 60), प्रशांत ज्ञानेश्वर सराफ, प्रतीक ज्ञानेश्वर सराफ, नेहा सराफ, पूजा शशिकांत जाधव आणि काशीनाथ रेवनशिधाप्पा वारद हे गंभीर जखमी झाले.
जखमींवर शिरवळमध्ये उपचार - अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहन बोगद्यातून बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. या अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे.
सहलीवरून परतताना काळाचा घाला - सलग सुट्ट्यांमुळे नागरीक सहलीचे नियोजन करून पर्यटनाला बाहेर पडले होते. पुण्यातील सराफ कुटुंबीय गोकर्ण महाबळेश्वरच्या सहलीला गेले होते. तेथून परतताना त्यांच्या गाडीला खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात झाला. दोन जणांवर काळाने घाला घातला तर पाच जण गंभीर जखमी झाले.
हेही वाचा - Children Death In Man River Akola: बाळापूर येथील मन नदी पात्रात बुडून दोन बालकांचा मृत्यू; व्यापाऱ्यांचा बंद