मुंबई - काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा या विधानसभा निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यावेळी आयोगाने सातारा लोकसभेची पोट निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते. मात्र, मंगळवारी अचानक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. अनेक राजकीय विश्लेषक याचा संबंध थेट शरद पवार यांच्या साताऱ्यातील शक्ती प्रदर्शनासोबत जोडत आहेत.
हेही वाचा... सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा
साताऱ्यात पवारांचे शक्ती प्रदर्शन आणि लोकसभेची पोटनिवडणूक
रविवारी शरद पवार यांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. या रॅलीसाठी साताऱ्यातील हजारो युवक राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर घेवून महारॅलीत सहभागी झाले दोते. यामुळे सातार्यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, दोन्ही राजांच्या उपस्थितीत भाजपच्या संपन्न झालेल्या महाजनादेश यात्रेची राष्ट्रवादीने हवा काढल्याची चर्चा संपूर्ण साताऱ्यात सुरू झाली होती. यामुळे या घटनेनंतर आज मंगळवारी म्हणजे पवारांच्या रॅलीच्या तिसऱ्याच दिवशी साताऱ्यातील पोटनिवडणूक जाहीर होणे, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सातारा लोकसभेबाबत भाजपला शंका ?
सातारा पोटनिवडणुकीतून आपल्या निर्णयाला लोकांचे समर्थन आहे, हे सिद्ध होईल, असे उदयनराजेंकडून सांगण्यात आले होते. पण भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याअगोदरच महाराष्ट्रात विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक व्हावी. याशिवाय पोटनिवडणुकीत दगाफटका झाल्यास राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासनही उदयनराजे यांनी भाजप पक्षप्रवेशावेळी घेतले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी सोडल्यास आपण येथून निवडून येण्याबाबत उदयनराजेंनाही शंका असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पावारांची साताऱ्यात झालेली महारॅली पाहता भाजपलाही ही जागा हातची जाण्याची भीती वाटत आहे. यामुळे विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घेतल्यास भाजपला हा धोका कमी होईल, या कारणास्तव ही पोटनिवडणूक आताच घेण्यात येत असावी, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा... 'आमचे साहेब..फक्त पवार साहेब..! राष्ट्रवादीच्या घोषणांनी सातारा दणाणला
उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून कडवे आव्हान मिळणार ?
उदयनराजेंनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर राजकीय वर्तुळातून याच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आपण साताऱ्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जात आहोत, असे उदयनराजेंनी सांगितले, तर विरोधकांनी मात्र त्यांच्या या मुद्द्याला खोटे ठरवले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उदयनराजेंनी भाजपप्रवेश केल्यानंतर त्यांनी जाहीर आव्हान दिले होते. नवाब मलिक यांनी उदयनराजे पोटनिवडणुकीत पुन्हा खासदार होणार नाही असे म्हटले होते, तर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी सोडणारा कधीच खासदार होत नाही,अशी टीका साताऱ्याच्या सभेत केली होती. यामुळे उदयनराजेंना पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे कडवे आव्हान असणार हे निश्चितच आहे. तेव्हा या विरोधाची दाहकता कमी व्हावी, यासाठी लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत घेतली जात असावी, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा... साताऱ्यात राष्ट्रवादी सोडणारा कधी खासदार होत नाही - जयंत पाटील
तारखा त्याच मग घोषणा वेगळी का ?
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा या विधानसभा निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. तेव्हा देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यावेळी आयोगाने सातारा लोकसभेची पोट निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते. मात्र, आता अचानक या निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर, निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीसाठी तारखा देण्यात आल्या आहेत. या तारखांवर नजर टाकल्यास विधानसभेच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशीच (21 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर) साताऱ्यातील लोकसभेसाठी देखील मतदान होणार आहे. यामुळे एकाच दिवशी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांसाठी आयोगाकडून दोन वेगवेळ्या घोषणा का करण्यात आल्या? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.