सातारा : जावळी तालुक्यातील कुडाळजवळ महू धरणात आज दुपारी गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) हा मुलगा पोहताना बुडून बेपत्ता झाला. अद्याप प्रणव याचा मृतदेह सापडला नसून महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान त्याचव शोध घेत आहेत.
पोहण्याच्या मोहात उडी
पोलिसांनी सांगितले की, महू (तालुका जावळी) या धरणात महू गावातीलच शिवराम नारायण गोळे हे आपला नातू प्रणव संतोष गोळे याच्यासह गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास शिवराम गोळे हे रस्त्याला लागूनच गुरे चारत होते. गुरांना पाणी पाजून आजोबा रस्त्याकडे निघाले होते. परंतु प्रणव हा त्याच दरम्यान धरणाच्या पाण्याकडे धावत जात होता. आजोबांनी आवाज दिला. परंतु तो तसाच पळत होता. प्रणव पळत पाण्याकडे गेला आणि कपडे काढून त्याने पाण्यात उडी घेतली.
शोधकार्य सुरु
आजोबांनी लगेच पुण्याला असलेला आपला दुसरा मुलगा अजित शिवराम गोळे याला कळवले. त्याने गावातील लोकांना सांगितले. गावातील युवकांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. त्याचा शोध घेतला परंतु प्रणव सापडत नसल्याने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण केले. प्रणवच्या कुटुंबीयांचा यावेळी आक्रोश अनावर झाला होता.