सातारा - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची विनंती माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. निंबाळकर यांनी मंगळवारी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना एक निवेदनही दिले.
कोरोना रुग्णांच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये असणारी दुरावस्था, मोलमजुरांचा प्रश्न, रेशन वाटप, व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रक्रिया याबाबतीत सरकार आणि प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यावर राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. कोरोना रुग्णांच्या किती चाचण्या झाल्या याबाबत राज्य सरकार वस्तुस्थिती लपवत असल्याचा आरोप, निंबाळकर यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
ग्रामीण भागांमध्येसुद्धा प्रशासनाचा कोणताही उपाययोजना दिसून येत नाही. राज्यामध्ये उपासमारीची वाढ झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये क्वारंटाईन करण्यासाठी सरकारने जागा उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामध्ये जेवणाची व्यवस्थाही नीट नाही, स्वच्छता नाही, अशा अनेक बाबी राज्यपालांना निदर्शनास आणून दिल्याचे भाजप नेत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची राजभवन वारी वाढली आहे. संजय राऊत, शरद पवार, प्रफुल्ल पटेल त्यानंतर नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे.
हेही वाचा - होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या वृद्धाचा मृत्यू; साताऱ्याच्या माणमधील घटना
हेही वाचा - भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न; पण सरकार स्थिरच - पृथ्वीराज चव्हाण