सातारा - राज्यभरात दूध दराबाबत भाजपाच्या वतीने आज आंदोलन केले जात आहे. साताऱ्यातील लोणंद येथे देखील दूध दरवाढ करण्याची मागणी करत सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेऊन आंदोलन करण्यात आले, तर रयत क्रांतीने दगडाला दुधाचा अभिषेक घालून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून आज करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हे सरकार तीन चाकी रिक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
दगडावर दूध ओतून साताऱ्यात रयत क्रांतीचे आंदोलन
आज राज्यभर भाजप व मित्र पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. याचेच पडसाद साताऱ्यात सुद्धा उमटताना दिसत आहेत. दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेनेही आंदोलन केले आहे. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याच्या रयत क्रांती संघटनेची मागणी रयत क्रांती संघटनेने जिल्ह्यातील शिवथर या गावात दगडावर दूध ओतून केलेल्या आंदोलनावेळी केली.