सातारा - राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने तीन आमदारांना धक्का देत सत्तांतर घडवले आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने १२ जागा जिंकल्या तर भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
राष्ट्रवादीला धक्का देत शिंदे गटाची बाजी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने यापुर्वी पाटण विधानसभा मतदार संघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवून सातारा जिल्ह्यात खाते उघडले होते. आता सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करत शिंदे गटाने दुसरे खाते उघडले आहे. तीन आमदार आणि खासदार श्रीनिवास पाटील असे दिग्गज एका बाजूला असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली आहे.