कराड (सातारा) - वॉटस्अॅपवर व्हायरल केलेल्या फोटोंमुळे घोरपडीच्या शिकारीचा प्रकार पाटण तालुक्यातील फडतरवाडीत उघडकीस आला असून, याप्रकरणी तीन जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच घोरपडीचे मांस, अॅल्युमिनिअमचे पातेले, कोयता आणि लाकडी ठोकळा असे साहित्यही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे.
मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण समितीचे सदस्य रोहन भाटे यांना पांढरेवाडी-वजरोशी येथील विनोद घाडगे याने फडरतवाडीत शिकार केलेल्या घोरपडीचे फोटो व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याचे आढळले. त्यानुसार पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल अशोक राऊत, वनरक्षक रवींद्र कदम, अरविंद जाधव यांनी सापळा रचून फडतरवाडी (घोट) येथील विनोद घाडगे यास ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून भाऊ गंगाराम साळुंखे, गणपत मारूती साळुंखे आणि सिंधु गणपत साळुंखे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणपत साळुंखे यांच्या घरातून घोरपडीचे मांस जप्त करण्यात आले असून, संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.