सातारा- राज्यातील सर्वाधिक जनावरांची संख्या असलेल्या येथील माणदेशी फाउंडेशनच्या चारा छावणीत सोमवारी बेंदुर सणानिमित्त बैलांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, रवींद्र विरकर नागरिक सहभागी झाले होते.
म्हसवड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील पुळकोटी रस्त्यावरती चारा छावणी असुन येथे आठ हजाराहुन अधिक जनावरे आणि त्यांच्यासोबत तीन हजार शेतकरी कुटुंबे मुक्कामी राहण्यास आहेत. दुष्काळाच्या संकटामुळेच शेतकरी कुटुंबे चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी राहिली आहेत.
बेंदुर सण छावणीतच साजरा करण्याचा निर्णय चेतना सिन्हा व विजय सिन्हा यांनी घेतला. माणदेशी फाऊंडेशन तर्फे छावणीतील जनावरांना बेंदुर सणानिमित्त सजवण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून द्यायचा आणि मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सायंकाळी बेंदुर सणानिमित्त मिरवणूक चारा छावणीतून म्हसवडकडे मार्गस्थ झाली. शहरातील नागरिकांनी या मिरवणुकीचे फटाक्याच्या आतषबाजीने ठिकठिकाणी स्वागत करुन सहभाग घेतला.
यावर्षी दुष्काळाच्या संकटात माण तालुक्यातील प्रत्येक गावात चारा व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने शेतकरी त्रासले आहेत. त्यामुळे ते मिळेल त्या किमतीला जनावरे विक्री करु लागले आहेत. अशीच परिस्थिती टिकुन राहिली तर माण तालुक्यात पशुधनच संपण्याची भिती निर्माण झाली होती. या समस्येचे निवारण करण्यासाठी चेतना सिन्हा यांनी सरकारच्या मदतीशिवाय 1 जानेवारीला राज्यातील पहिली चारा छावणी सुरु केली. या छावणीत सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील ६८ गावातील जनावरे आश्रयास आहेत. बजाज कंपनीने या छावणीला मदतीचा हात दिला आहे.