सातारा - महाराष्ट्रात अजून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील बेंदूर सणावर दुष्काळाचे सावट आले आहे. उद्यावरती येऊन ठेपलेल्या बैल पोळा (बेंदूर) सणाच्या लगबगीने बळीराजाचे अंतकरण भरुन आले आहे. हिरव्यागार शेताच्या बांधावरती दिमाखात उभी असणारी बैल जोडी आज ओस माळरानावरती छावणीच्या आधाराने चाऱ्यासाठी हंबरडा फोडताना दिसत आहेत. अशा दयनीय परिस्थितीत गोड पुरण पोळी खाऊन बळीराजाने बेंदूर सण साजरा करायचा तरी कसा? या विवंचनेने जिल्ह्यातील बळीराजाचे डोळे पाणावले आहेत.
ना नागरणी, ना कुळवणी, ना पेरणी, ना खुरपणी, खायला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि जनावरांना चारा नाही. काम करुन जगायचे म्हटले तरी हाताला काम नाही, अशी भीषण दुष्काळ परिस्थिती निसर्गाच्या अकृपेमुळे माणदेशी माणसाच्या नशिबी आल्यामुळे अनेक लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागले आहे. कृषीप्रधान भारत देशातील विविध राज्यातील शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गोठ्यातील बैलजोडी आणि पोटची लेकरं बळीराजाला सारखीच असतात. दरवर्षी पेरणीच्या धांदलीतून मोकळे झाल्यानंतर बळीराजा आषाढ महिन्यात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.
बेंदराला बैलांच्या मानेवरती तूप आणि हळद लावून औताच्या ओझ्यानी दुखावलेल्या मानेचा मसाज केला जातो. त्याचबरोबर डोक्याला आंब्याचे पानांचे तोरण बांधून खाण्यासाठी गव्हाचा गोड खिचडा केला जातो. तसेच बेंदूर सणादिवशी बैलांचे औक्षण करुन तेल, गुळवणी आणि अंडी, असे स्निग्ध पदार्थ पाजून शरीराची झालेली झीज भरुन काढली जाते. त्याचबरोबर बैलांच्या शिंगाला रंग लावून बेगडांची सजावट करुन गावातून भव्य मिरवणूक काढली जाते. याचवेळी बळीराजा परमेश्वराकडे भूमी-बळी-बैल जोडी हे नाते अतुट राहू दे आणि या बैल जोडीने मला आयुष्यभर साथ देवू दे, अशी प्रार्थना करत असतो. मात्र, आज भेगाळलेली जमीन, चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जनावरे यांची भूक भागावी यासाठी परमेश्वराकडे साकडे घालत आहे.
या भीषण दुष्काळाने लोक पाण्यासाठी तर जनावरे चाऱ्यासाठी हंबरडा फोडत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा' या उक्तीप्रमाणे दुष्काळावर मात करीत बैलांच्या ॠणातून उतराई होण्यासाठी 'बेंदूर सण साजरा करण्यासाठी बळीराजा धडपडत आहे.