सातारा - सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात आंदोलन ( Bandatatya Karadkar Controversial Statement ) केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा नेत्या पंकडा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने आता वाद चिघळला ( Bandatatya Karadkar On Supriya Sule ) आहे. राज्यात ठिकठिकाणी बंडातात्या कराडकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे.
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी दिल्यानंतर या निर्णयावर विविध स्तरांतून टीका केली जात आहे. कीर्तनकार बंडातात्या यांनी साताऱ्यात 'दंडवत दंडुका' या आंदोलनाद्वारे विरोध दर्शवला. आंदोलनादरम्यान झालेल्या भाषणात बंडातात्या यांनी वाइन विरोध बाजूला राहिला आणि महिला लोकप्रतिनिधींवर आरोप केले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच, आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या यांच्यासह 125 वारकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळेंबद्दलही वादग्रस्त विधान
'दंडवत दंडुका' आंदोलनात बोलातना बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्या पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. पंकजा आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात, असे त्यांनी म्हटले.
ढवळ्या शेजारी पवळा बांधला
बाळासाहेब ठाकरे, असा एक हिंदुत्वाता पुरस्कर्ता, हिंदूहृदयसम्राट अशी ज्यांची पदवी होती, ज्यांना हिंदू समाजानं डोक्यावर घेतलं. असा एका हिंदुत्ववादी पुढाऱ्याचा मुलगा आहे उद्धव ठाकरे. अशी दारु आणावी, मंदिरं बंद करावी, सप्ते बंद करावे, वारी बंद करावी, अशा विचाराचा पुढारी नाही उद्धव ठाकरे. पण ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला ना… ढवळा कोण तुमच्या लक्षात आलं असेल. अजितदादा ढवळा आणि त्याच्या शेजारी नेऊन हा पवळा बांधला, अशा शब्दांत बंडातात्या कराडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.
महिला आयोगाची दखल
बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. राज्य महिला आयोगाने सातारा पोलिसांना 48 तासांत बंडातात्या कराडकर यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सातारा पोलिसांनी घेतले ताब्यात
महिला आयोगाने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर सातारा पोलीस बंडातात्या कराडकर यांच्या पिंपरद येथील गुरूकुल आश्रमात पोहचले. बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशीसाठी सातारला आणण्यात येत आहे.
हेही वाचा - Building Collapse Pune : पुण्यातील येरवड्यात इमारत कोसळली; 5 जणांचा मृत्यू