सातारा - माझ्याकडे असलेल्या खात्यांमध्ये सेवा हमी कायद्याची कडक अंमलबजावणी होईल, असे आश्वासन राज्याचे महिला व बालविकास, शालेय शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. सेवा हमी कायद्यानुसार सेवा न देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यमंत्री बच्चू कडू हे सातारा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सेवा हमी कायद्यांतर्गत आत्तापर्यंत राज्यात एकही कारवाई झाली नव्हती. मात्र, मी पहिली कारवाई केली. सर्व खात्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र, त्यासाठी लोकांनी आमच्याकडे तक्रार करणे गरजेचे आहे. तक्रार आल्यानंतर आरपार कारवाई करण्याची जबाबदारी आमची, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
कामात दिरंगाई करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. मात्र, त्यांच्यामुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. अशा लोकांना आम्ही सोडणार नाही. सामान्य लोकांची कामे झाली नाहीत तर, संबंधितावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे बच्चू कडू म्हणाले.
विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचे पूर्वीच्या सरकारने कबूल केले होते. मात्र, अनुदानाची तरतूद केली नव्हती. आगामी अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) लागू करायचा की, नाही हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे सीएए लागू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत जी काही भूमिका घ्यायची असेल ती मंत्रिमंडळ बैठकीत घेतली जाईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.