सातारा - लोकनेते दिवंगत यशवंतराव चव्हाणांचे नाव घेणार्यांना यशवंतरावांच्या समाधीस्थळाभोवती पूरसंरक्षक भिंतही उभारता आली नाही. उलट मुख्यमंत्री असताना त्यांनी कराडकरांच्या मानगुटीवर बसविलेले शंभर फुटी रस्त्याचे भूत आम्हीच उतरवले, असा टोला महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी मारला. कराड येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, भाजप सरकार विकासाला प्राधान्य देणारे आहे. कराड शहराच्या विकासासाठी भाजप सरकारने भरघोस निधी दिला आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्नही मार्गी लावल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, प्रीतिसंगम घाट टूरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी नमामी कृष्णा सारखा प्रोजेक्टही आम्ही राबविणार आहोत. मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणताही रोजगार निर्माण केला नाही. परंतु, आता गाडीत बसायला 200 रूपये, घोषणा देण्यासाठी 400 रूपये आणि घालून-पाडून बोलण्यासाठी 10 हजार रूपये देऊन त्यांनी काही माणसे पोसण्याचा उद्योग केला आहे. त्यांचे हे दुकान 21 तारखेपर्यंतच उघडे राहणार आहे. त्यानंतर त्यांच्या दुकानाला कायमचे कुलुप लागणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - श्रमिक मुक्ती दलाचा अॅड. उदयसिंह उंडाळकरांना पाठिंबा; डॉ. पाटणकरांची घोषणा
पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण, त्यांनी काँग्रेस पक्षच संपवून टाकल्याचा घणाघात करून कृष्णा कारखान्याचे चेअरमन मदनराव मोहिते म्हणाले, गेल्या 10 वर्षात त्यांनी काय दिवे लावले? 60 वर्षे सत्तेत असतानाही पृथ्वीराज चव्हाण हे कुचकामी नेतृत्व ठरल्याची टीका मोहिते यांनी केली.
कराडची ओळख म्हणून स्वत:चे फोटो लावणार्यांनी लक्षात घ्यावे की, कराडची ओळख हजारो वर्षांपासून आहे, असा इशारा देत राजेंद्रसिंह यादव म्हणाले, 2014 साली त्यांना आम्ही मनापासून मदत केली. शहराच्या प्रगतीसाठी आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. पण, पृथ्वीराज चव्हाणांनी केवळ द्वेष आणि सुडाचे राजकारण केले. मताधिक्क्य दिलेल्या शहरावरच ते नांगर फिरवायला निघाले आहेत. त्यांच्याकडे सत्ता होती, पण इच्छाशक्ती नव्हती. त्यांनी निश्चित केलेल्या पुररेषेमुळे कराड शहराच्या 60 टक्के भागावर नांगर फिरला. स्वत:चे घर मात्र चव्हाणांनी सहीसलामत ठेवल्याचा आरोप यादव यांनी केला.
हेही वाचा - 'आमदार बाळसाहेब पाटील हे कराड उत्तरला लागलेले ग्रहण'
यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कराडचे उपनगराधयक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.