सातारा - आजारपण मागे असताना अपेक्षित असलेले बदलीचे ठिकाण न मिळाल्याने, येथील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी विजय चंद्रकांत माळी (वय 49) यांनी मंगळवारी सकाळी यवतेश्वर येथे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या अगोदर माळी यांनी आपण आत्महत्येचा का निर्णय घेत आहोत, याबात एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
'सोमवारी खात्यांतर्गत पोलिसांच्या बदल्या झाल्या'
विजय माळी यांच्यावर सध्या साताऱ्यातील खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. हवालदार माळी यांनी सोमवारी रात्री सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रसारित केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी अनेकांची मर्जी राखत पोलीस दलात बदल्या केल्या जातात, असा गंभीर आरोपही येथील पोलीस अधीक्षकांवर केला होता. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. सातारा शहर वाहतूक शाखेमध्ये हवालदार विजय माळी हे वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी खात्यांतर्गत पोलिसांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये काही पोलिसांना मनासारखी बदली मिळाली नाही. त्यापैकी एक असणारे माळी यांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये माळी काय म्हणाले?
"मी समक्ष मुलाखतीला गेलो तेव्हा शाहूपुरी पोलीस ठाणे आणि डॉग स्कॉड येथे माझ्या नावापुढे बदली लिहिण्यात आली होती. पण माझी बदली माण तालुक्यातील म्हसवडमध्ये करण्यात आली. त्यामुळे मी स्वतः सोमवारी पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी तुम्हाला म्हसवडला जावे लागेल, असे सांगितले. यावर मी त्यांना माझ्या मणक्याच्या तसेच शुगर, बीपीच्या आजाराचे उपचार साताऱ्यात सुरू आहेत, असे सांगितले. मात्र तरीही ते म्हणाले तुम्हाला जावेच लागेल. तेथे यापूर्वी तीन चालक आहेत. असे, सांगूनही ते म्हणाले तुम्हाला जावेच लागेल.
'माझी विनंती अमान्य केली'
कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी माझी म्हसवड या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. माझे कुटुंब माझ्या पगारावर अवलंबून आहे. मी साताऱ्यातील 'एमटी' या वाहन विभागात बदली मागितली आहे. मात्र, या ठिकाणी मला बदली देण्यात आली नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे, असे त्यांनी शेवटी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान, माळी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची धावाधाव सुरू झाली. विजय माळी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचारी मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी गेले. मात्र, माळी घरात नव्हते. अखेर ते यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.