सातारा - कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी आलो, अशी बतावणी करून एका महिलेसह तिघांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी तिघांना चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सातार्यातील रविवार पेठेत घडली. पळून गेलेल्या एका संशयितालाही पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पाचजणांचे टोळके रविवार पेठेत संशयितरित्या फिरत होते. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना नागरिकांनी हटकले. मात्र, तरीसुद्धा संबंधित व्यक्ती त्याच ठिकाणी घुटमळत होत्या. काही जागृक नागरिकांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांचा संशय वाढला. संशयितांची पिशवी तपासली असता त्यामध्ये एअरगन आणि क्लोरोफॉर्म आढळून आले. संतापलेल्या नागरिकांनी संबंधित दरोडेखोरांना चांगलाच चोप दिला व नंतर त्यांना पोलिसांच्या हवाली केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.