सातारा - शहरातील 'स्व. क्रांतीसिंह नाना पाटील' रुग्णालयात जमलेल्या टोळक्यांकडून रुग्णालयात गोंधळ घालण्यात आला. यादरम्यान रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.
सातारा शहरातील सदरबझार परिसरात दोन दिवसांपूर्वी वडापावच्या पैसे देण्यातून झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर जखमी झालेल्या 'मौलाली डोंगरे' आणि 'प्रकाश कांबळे' यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी जिल्हा रुग्णालयात १५ ते २० जणांचे टोळके समोरासमोरा आल्याने वादाचा प्रसंग उदभवला. यादरम्यान काही संशयितांनी डॉक्टरांना धक्काबुक्की करत रुग्णालयात गोंधळ घातला व रुग्णालयात तोडफोड केली.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून, सातारा शहर पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन हस्तक्षेप करत यातील ८ संशयितांना अटक केली. या प्रकरणातील पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.