सातारा - येथील सहायक कामगार आयुक्ताला 2 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कामगारांची नोंद करण्यासाठी तब्बल आठ लाखांची लाच मागितल्याची माहिती पुढे आली आहे.
केली होती 11 लाख रुपयांची मागणी
संजय शामराव महानवर (वय 42, रा. धुमाळ निवासस्थान, संभाजीनगर, सातारा) असे संबंधित संशयिताचे नाव आहे. साताऱ्यायात सहायक कामगार आयुक्त म्हणून तो काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार शिरवळ येथील विविध कंपन्यांना कामगार पुरवठा करण्याचे कंत्राट घेतात. कामगारांची नोंदणी करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त संजय महानवर याने लेबर सप्लायरकडे 11 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 8 लाख रुपयांवर दोघांत तडजोड मान्य झाली. त्यापैकी 2 दोन लाख रुपये घेताना संजय महानवर याला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले.
हे आहेत शिलेदार
ही कारवाई एसीबी पुण्याचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, एसीबी सातारा पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो. हवा. शिंदे, पो. ना ताटे, खरात, पो. कॉ. काटकर, भोसले यांनी केली.