कराड (सातारा) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत माडखोल (ता. सावंतवाडी) गावातील जंगलात सिंगल बोअरच्या बंदुकीने दोन शेकरूंची शिकार करणाऱ्या सैन्य दलातील जवान लिलाधार मिनोनाथ वराडकर या जवानास वनविभागाने अटक केली. याप्रकरणी कराडचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचा पाठपुरावा सुरू होता. तब्बल सात दिवसांनी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. दरम्यान, संशयितास आज न्यायालयात हजर केले असता त्याला १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शेकरूला वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले आहे. तसेच शेकरू हा महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे. गेल्या आठवड्यात साधारण 1 ते 3 एप्रिल दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली होती. परंतु, लाॅकडाऊनचे कारण पुढे करून शिकाऱ्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात होती. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र आणि संशयीत आरोपीची माहिती वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य आणि कराड येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी गोपनीयरित्या मिळविली.
शिकार करणारा युवक हा भारतीय सैन्य दलातील पुरवठा विभागात जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये कार्यरत आहे. सध्या तो सुट्टीवर गावाकडे आला असल्याचीही माहिती भाटे यांना मिळाली. ही माहिती शुक्रवारी (दि. १०) रात्री ११ वाजता सावंतवाडीचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही क्लेमेंट बेन, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना लिखित स्वरूपात देत घटनेची कल्पना दिल्याचे कराडचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.
शेकरु मारुन त्याचे स्टेटस शिकाऱ्याने डीपीला ठेवले आहे. त्या शिकाऱ्याला शोधून काढण्यात वनखात्याला यश आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात बसणे गरजेचे असताना शिकार करुन फोटो स्टेटसला ठेवणे विकृती आहे. ज्या व्यक्तीने शेकरुची शिकार केली त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना वनखात्याला आणि पोलिसांना दिल्या आहेत, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.