सातारा - कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात आणखी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह सापडला असून एका महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्यांनी वर्तविला आहे.
हेही वाचा - Ind Vs Aus: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
वडगाव-उंब्रज येथील वनविभागाच्या हद्दीलगत असणार्या खाणीत बिबट्याचा मृतहेद सापडला आहे. कराड तालुक्यात गेल्या काळात अनेक बिबट्यांचे मृतदेह सापडले आहेत. बिबट्यांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. न्यूमोनियासदृष्य आजाराने बिबट्यांचा मृत्यू होत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वीच कराड तालुक्यातील गमेवाडी गावाच्या शिवारातही बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर आता वडगाव-उंब्रज येथील बंद असलेल्या खाणीत आणखी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे.
या बिबट्याचा मृत्यू निमोनियाने सुमारे एक महिन्यापूर्वी झाला असावा, असा अंदाज वन अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. मृत बिबट्याचे जागेवरच शवविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले.