कराड (सातारा) - अज्ञात वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाल्याची घटना पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खोडशी (ता. कराड) हद्दीत मंगळवारी रात्री घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), दोघेही (रा. कुमठे, ता. सातारा) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांच्या समवेत गंभीर जखमी झालेल्या श्रीजीत अमित जाधव या 8 वर्षे वयाच्या मुलाचाही रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
दोघे जागीच ठार-
कुमठे (ता. सातारा) येथील सोमनाथ पवार आणि विक्रम निकम हे कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात फॉर्म भरण्यासाठी मोटरसायकलवरून गेले होते. त्यांच्या बरोबर 8 वर्षाचा श्रीजीत जाधव होता. फॉर्म भरून पुन्हा सातार्याकडे जात असताना खोडशी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. तर श्रीजीत गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद-
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महामार्ग मदत केंद्राचे पोलीस आणि हेल्पलाईनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह आणि अपघातग्रस्त मोटरसायकल बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे मोटरसायकलला कोणत्या वाहनाने धडक दिली, हे समजू शकले नाही. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीसाठी मंत्री राठोड वर्षा बंगल्यावर